नाशिक –
नाशिकमधील बाल निरीक्षणगृहातून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय मुलीचा अखेर यशस्वी शोध लागला आहे. सुरुवातीला तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला होता, मात्र पोलीस तपासात समोर आलेली खरी गोष्ट थक्क करणारी आहे.
काय घडलं होतं?
बाल निरीक्षणगृहात राहणारी एक १७ वर्षीय मुलगी अचानक गायब झाली. तिच्या अपहरणाची शक्यता वर्तवून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांचा तांत्रिक तपास फळाला आला
गुन्हे शाखा युनिट-२ने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करत कसून तपास सुरू केला. प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अचूक माहिती मिळवली आणि सत्य उघडकीस आले.
तीर्थाटनाचा मोह, एकाकीपणातून पलायन
पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, बालगृहातील एकाकीपणामुळे मानसिक तणावात आलेली ही मुलगी स्वतःहून निघून गेली होती. घरातून पळून गेल्यानंतर ती पंढरपूर, अक्कलकोट, आळंदी, भीमाशंकर आणि जेजुरी या प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देत होती. ती तीर्थाटन करत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस आयुक्तालयात सत्कार
गुन्हे शाखा युनिट-२च्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बाल निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह, कार्यकारी मंडळ सदस्य हितेश शाह, तसेच राधिका धोंडगे आणि स्वाती म्हस्के यांनी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (भा.पो.से.) यांची भेट घेऊन आभार मानले. तपासात सहभागी पथकाचा सत्कार करण्यात आला.
सत्कारित अधिकारी :
सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे
सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे
सहायक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर
पोलीस अंमलदार प्रकाश महाजन, तेजस मते, जितेंद्र वजीरे, गणेश रुमाले, हर्षल महाले, अमोल टर्ले, गणेश पगार
💐 नाशिक पोलीस दलाचे या यशाबद्दल कौतुक होत आहे.