खामगाव –
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली असून, या यादीत काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते धनंजय दादा देशमुख यांचे नाव नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तर काही माध्यमांनी विविध तर्कवितर्क मांडण्यास सुरुवात केली. काहींनी तर ते दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची शक्यताही वर्तवली. मात्र, यावर आता खुद्द देशमुखांनीच स्पष्ट भूमिका घेत स्पष्ट केलं आहे की — “मी काँग्रेसमध्येच होतो, आहे आणि राहीन!”
तीन दशकांची राजकीय वाटचाल…
धनंजय देशमुख यांनी स्वतःच्या सोशल मीडियावरून पदमुक्तीबाबत एक भावनिक, पक्षनिष्ठा व्यक्त करणारी, आणि नेते कार्यकर्त्यांचे आभार मानणारी पोस्ट लिहीत आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला होता. त्यांनी १९९२ मध्ये NSUI च्या उपाध्यक्षपदावरून आपली संघटनात्मक कारकीर्द सुरू केली. त्यानंतर युवक काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष, बुलढाणा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, तसेच छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये निरीक्षक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या.
पक्षाप्रती निष्ठा कायम
धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं की, “आज मी पदमुक्त झालो असलो तरी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझं कार्य अविरत सुरू राहील. पदं ही कार्याचा भाग असतात, पण पक्षाशी असलेली निष्ठा ही कायमस्वरूपी असते.”
चुकीच्या बातम्यांवर नाराजी
काही माध्यमांमध्ये, त्यांच्या काँग्रेसमधून बाहेर जाण्याच्या शक्यतेबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र या सगळ्या अफवा असून, त्या “कुठल्यातरी चुकीच्या माहितीच्या आधारावर आलेल्या आहेत,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
ते पुढे म्हणाले की – “मी नुकतीच एक पोस्ट प्रसारित केली होती, ज्यात मी कार्यकर्त्यांचे आणि वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले होते. त्या पोस्टमधून काहींनी चुकीचा अर्थ लावला. मी अजूनही काँग्रेसमध्ये आहे आणि राहीन.”
कार्यकर्त्यांशी आत्मीय नातं
देशमुख यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना म्हटलं की, “हा प्रवास माझ्यासाठी केवळ पदांचा नव्हता, तर कार्यकर्त्यांशी जोडलेला एक आत्मीय संबंध होता.”
📌 धनंजय देशमुख यांचे संपूर्ण वक्तव्य हे निष्ठेचा आदर्श ठरणारे आहे. पक्षीय राजकारणात पदं येत-जात राहतात, पण मूल्यांशी नातं टिकवणं हेच खऱ्या कार्यकर्त्याचं लक्षण असतं., हेच धनंजय दादा देशमुख यांनी दाखवून दिलं आहे.