36 C
New Delhi
Wednesday, September 10, 2025
spot_img
Homeलाईफ स्टाईलनथुराम समजून घ्या जसाच्या तसा..!

नथुराम समजून घ्या जसाच्या तसा..!

स्वयंघोषित कीर्तनकार सध्या नथुरामाचे समर्थन करताना दिसत आहेत. वरून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत. याच न्यायाने उद्या कुणी कीर्तनातून ओसामा बिन लादेन चे उदात्तीकरण करेल आणि म्हणेल की व्यक्तीस्वातंत्र्य आहे तर चालेल काय? कुणाला कोणत्या विचारधारेने जायचे आणि कुणाला समर्थन करायचे याची जबरदस्ती आपण करू शकत नाही. पण नथुरामासारख्या आतंकवाद्याचे, बिष्णोई सारळ्या गँगस्टरचे समर्थन एक वारकरी कीर्तनकार म्हणून तुम्ही करूच शकत नाही. त्यांचे समर्थन करायचे असेल तर तुम्ही प्रत्यक्ष भाजपमध्ये, आरएसएस, हिंदू महासभेत सामील व्हा. पण संतांनी दाखवलेल्या समतेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार म्हणून तुम्ही अशा विकृतांचे समर्थन करूच शकत नाही. संत ज्ञानेश्वरांचा छळ करणाऱ्या, प्रबोधनकार ठाजरेच्या म्हणण्यानुसार संत तुकारामांच्या गाथा पाण्यात बुडवून त्यांचा खुन करणाऱ्या, एकूणच संपूर्ण वारकरी संप्रदायाचा छळ करणाऱ्या मनुवादी विचारसरणीचा नथुराम आणि त्याच्या अगदीच विरोधात असणारी आपली वारकऱ्यांची समतावादी हिंदू धर्माची विचारसरणी आहे. मग नथुरामाचे समर्थन करणे म्हणजे सर्व वारकरी संतांच्या छळाचे आणि हत्येचेच समर्थन करणे होय. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, एखादा गँगस्टर म्हणून, एखादा सामान्य माणूस म्हणून अशी वक्तव्य केली असती तर कुणी काही हरकत घेण्याचे कारण नव्हते. आजही हिंदू महासभेचे अनेक लोक नथुरामाच्या विकृत प्रवृत्तीचे समर्थन करतातच. पण तुम्ही वारकरी संप्रदायाशी संबंध दाखवून अशा विकृतीला कदापि समर्थन देऊ शकत नाही. समाजातील नायक असो की खलनायक तो जगासमोर यायलाच हवा परंतु जसा आहे तसाच. म्हणजे खऱ्या स्वरूपात.गांधींच्या हत्येच्या समर्थनाकरिता नथुराम गोडसे याने आपल्यावरील आरोपपत्राला उत्तर देतांना ८ नोव्हेंबर १९४८ रोजी न्यायालयात जे ९३ पानांचे निवेदन दिले त्याचा दाखला दिला जातो. आजच्या नवीन पिढीला सुद्धा त्याच निवेदनाच्या ऑडिओ टेप ऐकविल्या जातात व गांधी कसा खलनायक होता व नथुराम कसा नायक होता हे नवीन पिढीच्या मनावर ठसविण्याचे केविलवाणे प्रयत्न केले जातात. यावर्षीसुद्धा गांधी पुण्यतिथीला सोशल मीडियावर गोडसे समर्थकांनी भरभरून गोडसेच्या समर्थानात खोट्या गोष्टींचा प्रचार केला. खोट्या पोस्ट फिरवल्यात. ज्यांनी गांधी आणि गोडसे बद्दल पुस्तके वाचलीत त्यांना ह्या अपप्रचाराने फरक पडणार नाही, परंतु ज्यांनी कधीच गांधी आणि गोडसे बद्दल एकही पुस्तक वाचले नाही अशा न्यूट्रल लोकांना ह्या खोट्या पोस्टवर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. बरे ह्या खोट्या पोस्ट फिरवणाऱ्यांनी एकही पुस्तक वाचलेलं नसतं हे विशेष.नथुरामाच्या ह्या खोट्या प्रचारापैकी सर्वात मोठा अपप्रचार असा की, नथुराम गोडसेने सुनावणीदरम्यान न्यायालयात जे बयान दिले ते जगासमोर का येऊ देईल नाही, का लपवून ठेवण्यात आले वगैरे. अहो, ते बयान जर लपवून ठेवण्यात आले असते, लोकांसाठी खुले केले नसते तर त्याच बयानावर आधारित 55 कोटींचे बळी हे पुस्तक गोपाल गोडसे कशाच्या आधारावर लिहिले असते? नथुरामवर जे चित्रपट, नाटक; लिहिले गेलेत ते कशाच्या आधारावर लिहिले गेले असते? गोडसे समर्थक ज्या नथुरामच्या बयानाच्या पोस्ट फिरवत आहेत तसेच ज्या ऑडिओ क्लिप फिरविल्या जाताहेत त्या कशाच्या आधारावर फिरवल्या असत्या? ते नथुरामने कोर्टात सादर केलेले निवेदन खटला चालला तेव्हापासूनच सर्वांसाठी उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट अशी की, नत्थूरामाने जे निवेदन दिले ते अगदी १००% खरेच आहे असे कुणी कसे काय म्हणू शकतो? कोर्टात प्रत्येकच आरोपी स्वतःची सकारात्मक बाजू मांडत असतो म्हणजे तो खराच बोलत असतो काय? कोर्ट ते पडताळून बघणार नाही काय?नथुरामने न्यायालयात सांगितले की गांधींनी देशाची फाळणी केली आणि ५५ कोटी पाकिस्तानला द्यायला लावले, मुस्लिमांना झुकते माप दिले म्हणून मी गांधींना मारले. परंतु तत्कालीन पुरावे तपासले तर नत्थूरामाचा शब्द अन शब्द धादांत खोटा असल्याचे आपल्या लक्षात येईल. १९३४ सालापासून गांधींवर ५ वेळा हल्ले झालेत. त्यात नत्थुराम गोडसे सामील होता. १९४४ मध्ये देशाची फाळणी झालेली नव्हती, त्यामुळे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा विषयच नव्हता. मग त्यावेळी नत्थुराम पाचगणीला गांधींवर चाकू घेऊन का धावला? साताऱ्याच्या भिलारे गुरुजींनी नत्थुरामला पकडून दाबून धरले होते. मग त्यावेळी फाळणी आणि ५५ कोटींचा विषय नसतांना गांधींवर का हल्ला केला हे तो बयानात सांगत नाही.गांधी मुस्लिमधार्जिणे होते म्हणतोय पण टिळकांनी १९१६ साली केलेल्या लखनौ करारात मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण दिले, उर्दू भाषेला विशेष दर्जा दिला, मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाला टिळकांच्या नेतृत्वातील काँग्रेसकडून १९१६ साली मान्यता देण्यात आली. या कराराचे समर्थन करतांना टिळक म्हणाले होते ’आमच्या मुस्लिम बांधवांना आम्ही हिंदूंनी वाजवीपेक्षा झुकते माप दिले असे काही जणांचे म्हणणे आहे. स्वराज्याचे हक्क फक्त मुस्लिम समाजाला दिले गेले, तरी मला त्याची पर्वा नाही,’ इथपर्यंत टिळकांचं मुस्लिमांना समर्थन होतं. पण टिळकांबद्दल नत्थुराम एक शब्दसुद्धा बोलत नाही. आणि ’हिंदू धर्म माझा जीव आहे. गीता माझी माता आहे’, असे म्हणणाऱ्या व ज्यांच्यामागे या देशातला संपूर्ण हिंदू होता त्या गांधींना मुस्लिमधार्जिणे म्हणतो. गांधींनी कायम मुस्लिमांच्या अवाजवी मागण्यांचा स्वीकार केला असे गोडसे सांगतो. परंतु मुस्लिमांच्या कोणत्या मागण्या गांधींनी स्वीकार केल्या याबद्दल मात्र कुठलंही स्पष्टीकरण तो देत नाही. कारण 1916 मध्ये टिळकांनी लखनऊ करारामध्ये जे मुस्लिमांच्या मागण्या मान्य केल्या त्यानंतर काँग्रेसने किंवा गांधींनी मुस्लिमांच्या कोणत्याच मागण्या कधीच मान्य केल्या नाहीत. उलट टिळकांनी मुस्लिमांना दिलेले विभक्त मतदारसंघ व उर्दू भाषेला दिलेला विशेष दर्जादेखील स्वातंत्र्यानंतर गांधींनी काढून टाकायला लावला.आपल्या निवेदनातून स्वतःला देशभक्त सिद्ध करू पाहणाऱ्या गोडसेने मात्र स्वातंत्र्यलढ्यात कुठेच सहभाग नोंदविलेला दिसत नाही. अनेकदा देशभक्त गांधींवर हल्ले करणारा गोडसे एकदाही कुण्या इंग्रजांवर हल्ला करतांना दिसला नाही. कारण नत्थुराम अत्यंत भ्याड होता; गांधींची हत्या केल्यानंतर मी हिंदू आहे हे छातीठोकपणे सांगण्याचीही त्याच्यात हिम्मत नव्हती. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसे हा प्रत्यक्षात एक नंबरचा फट्टू होता. त्याच्या भ्याडपणाचा आणखी महत्वाचा पुरावा म्हणजे 15 नोव्हेम्बर 1949 ला नथुरामला फाशी देत असतांना तेथे उपस्थित असलेल्या जस्टीस खोसला यांनी प्रत्यक्ष पाहिलेला प्रसंग त्यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे. नत्थुराम आणि आपटे या दोघांनाही मागे हात बांधून कोठडीतून बाहेर आणलं गेलं. गोडसे समोर चालत होता. त्याचे पाय फाशीला जातांना अडखडत होते, त्याची चाल त्याची घाबरलेली अवस्था आणि वाटणाऱ्या भीतीची साक्ष देत होती. त्याने बाहेरून मजबूत दाखविण्याचा प्रयत्न करतांना अखंड भारताचा नारा दिला. परंतु त्याचा आवाज फाटत होता, कोर्टात त्याने दाखविलेला उत्साह ओसरला होता. शेवटच्या दिवसात तो आपल्या कृत्यावर पश्चात्ताप करत होता आणि तो म्हणत होता की, एक संधी जर मला मिळाली तर उरलेले आयुष्य मी शांतीच्या प्रचारात आणि देशाच्या सेवेत लावेल. दोघांना फाशी दिली गेली. दोघांच्याही प्रेतावर तुरुंगातच अंत्यसंस्कार करून त्यांची राख घग्गर नदीमध्ये अनोळखी जागेवर वाहून टाकण्यात आली.” ह्या गोष्टी मात्र नथुरामचा उदो-उदो करणारे हे खोटे प्रचारक कधीच सांगत नाहीत.याबद्दल मी ‘मजबुती का नाम महात्मा गांधी या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. विशेष म्हणजे घग्गर नदीत एका अनोळखी जागेवर वाहून दिलेली नत्थूरामाच्या जळालेल्या शरीराची राख ह्या गोडसे समर्थकांनीं कुठून आणली हे आजही न उलगडलेलं कोडं आहे.ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात गांधींजवळ कोणती पावर होती? पोलिसांची पावर होती की सैन्याची पावर होती? गांधींकडे फक्त या देशातील जनतेची, त्या जनतेच्या प्रेमाची पावर होती. आणि या देशावर, देशातील नागरिकांवर प्रेम करणाऱ्या गांधींचा खून करणे म्हणजे या देशातील नागरिकांचा, त्यांच्या भावनांचा खून करणे आहे. हे फक्त एक दहशतवादीच करू शकतो.फाळणीसाठी व भारतातील दंगलींकरता मुख्य जबाबदार मुस्लिम लीग, तिचे नेते व मुख्यत्वे मोहम्मद अली जीना यांना मारणे तर दूरच त्यांचा गोडसेने कधी साधा निषेध सुद्धा केलेला नाही. ‘डायरेक्ट अॅक्शन’चा ठराव घेतांना जीना म्हणाले होते, इंग्रजांजवळ भरपूर शस्त्रं आहेत. काँगेसजवळ सत्याग्रह आहे. आमच्याजवळ पिस्तूल आहे आणि त्याचा उपयोग करायची वेळ आली आहे. वायव्य सरहद्द प्रांताचे मुस्लिम लीग नेते अबुलरब निस्तार यांनी तर ‘रक्ताच्या नद्या वाहिल्याशिवाय पाकिस्तान मिळणार नाही. अशी प्रक्षोभक वक्तव्ये करून व ‘डायरेक्ट अॅक्शन’ प्लॅन कृतीत आणून देशभरात दंगली घडविणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्यांबद्दल गोडसे एकदाही आपल्या निवेदनातून साधा निषेध व्यक्त करत नाही. त्यांच्यावर एकदाही हल्ले करत नाही. पण ह्या दंगली ज्यावेळी घडत होत्या तेव्हा ज्या नौखालीत मुस्लिमांची संख्या 90% व हिंदू फक्त 10% असल्याने हिंदुधर्मीय लोक मोठ्या प्रमाणात दंगलीत बळी पडत होते त्यावेळी ज्या गांधींनी त्या नौखालीत दाखल होऊन, दुःखितांचे दुःख निवारण झाल्याशिवाय मी नौखालीतून हलणार नाही. त्यात मला मृत्यू आला तरी चालेल, पण पराभूत होऊन मी परतणार नाही अशी प्रतिज्ञा करून तिथली दंगल शमवली त्या 80 वर्षांच्या म्हाताऱ्या निःशस्त्र गांधींची मात्र हत्या करतो? या सर्व गोष्टींची कारणे द्यायला गोडसे बहुधा विसरला असावा. स्वतःची अक्कल पूर्णपणे गहाण ठेऊन दुसऱ्यांच्या रिमोटने चालणारा रोबो होणे. एखादा कुत्राही आपल्या मालकाचे इतके काटेकोर आदेश पाळणार नाही इतके गुलाम होणे म्हणजे नथुराम होणे आहे, कारण नथुरामला स्वतःची बुद्धी नव्हती. आरएसएस आणि हिंदूमहासभा या संघटना आणि त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात येऊन त्याने हे काम केले ज्याचा त्याला शेवटच्या क्षणी पश्चात्ताप होत होता हे आजच्या पिढीने समजून घेतले पाहिजे. त्यामुळे ज्यांचे मेंदू गहाण आहेत, जे स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाहीत तेच लोक नथुचे समर्थन करत असतात हे लक्षात ठेवा. संपूर्ण आयुष्यभर ब्रिटिशांशी लढलेल्या देशभक्त गांधींवर शेकडो आरोप लावतांना स्वतः देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध केलेले एकही कार्य नथुराम गोडसे लिहू शकला नाही, फाळणीला जबाबदार मुस्लिम नेत्यांविरुद्ध एकही कारवाई तो लिहू शकला नाही ही बाब गोडसेचा राष्ट्रद्रोहीपणा व खोटेपणा उघड करण्यास पुरेशी आहे. हा खरा नथुराम जगासमोर आला पाहिजे. म्हणजे लोकांना ठरवता येईल की हा नायक होता की आतंकवादी.. –

चंद्रकांत झटाले, अकोला

7769886666

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments